जळगाव समाचार | १९ फेब्रुवारी २०२५
१५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात संत शिरोमणी सद्गुरु सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने इंडियन आयडॉल मराठीचे उपविजेते व सुप्रसिद्ध गायक जगदीश चव्हाण यांनी गायलेल्या ‘सारी गोरूर तू सेवाभाया’ या बंजारा बोली भाषेतील गाण्याने संपूर्ण बंजारा समाजाला मंत्रमुग्ध केले आहे. हे गाणे VR BANJARA या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
या गाण्याचे लेखन कुणाल पवार यांनी केले असून, ऋषिकेश बी यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच, विशाल राठोड यांनी या गाण्यात मुख्य भूमिका साकारली आहे. जगदीश चव्हाण हे अत्यंत गरीब कुटुंबातून आले असले तरी आपल्या कलेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण भारतासह परदेशातही महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.
जगदीश चव्हाण यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यामध्ये – ‘काळजाचं पाखरू’, ‘सेवालाल तू भगवान’, ‘गरुड झेप घे रे मना’, ‘तू धाव मर्दा धाव’, ‘आम्ही छत्रपती शिवबाचे मर्द मावळे’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे. याशिवाय, ते मराठी, हिंदी, गुजराती आणि बंजारा बोली भाषेतही सातत्याने गाणी गात असतात.
संगीत आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणारे जगदीश चव्हाण लवकरच ‘गोरमाटी सेवालालेर छा’ हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना या आगामी गाण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.