जळगाव समाचार | १५ फेब्रुवारी २०२५
प्रसिद्ध उद्योजक आणि ‘केसरी टूर्स’चे संस्थापक तसेच अध्यक्ष केसरी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे पर्यटन क्षेत्रात एक शून्य निर्माण झाले आहे.
केसरी पाटील यांनी वयाच्या ५०व्या वर्षी ‘केसरी टूर्स’ची स्थापना करून कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. त्यांच्या उत्तम व्यवस्थापन आणि उद्यमशीलतेच्या कौशल्यामुळे त्यांनी कंपनीचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. त्यामुळेच त्यांना पर्यटन क्षेत्रातील विद्यापीठ म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन आज संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत बांद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरी पाटील यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले की, या क्षेत्रातील रोजगार आणि व्यवसाय, व्यवस्थापन संधीची माहिती आणि अनेकांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा देण्यात ते मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. त्यांच्या निधनामुळे एका धडाडीच्या, उद्यमशील अशा व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. केसरीभाऊ यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या केसरी समूहाशी निगडित सहृदयींच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.