जिल्ह्यात लाचखोरीचा अनोखा प्रकार; मेहू गावात महिला सरपंचासह, पती, मुलगा व एक साथीदार अटकेत…

 

जळगाव समाचार | १३ फेब्रुवारी २०२५

जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरीचे प्रमाण वाढत असताना मेहू (ता. पारोळा) येथे एकाच घरातील तीन जणांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. महिला सरपंच, त्यांचे पती आणि मुलगा यांना एका खासगी व्यक्तीसह एकूण चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. जळगाव जिल्ह्यात एका घरातील तीन सदस्यांसह चौघांवर लाचखोरीप्रकरणी कारवाई झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

पारोळा तालुक्यातील मेहू ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच जिजाबाई पाटील, त्यांचे पती गणेश पाटील, मुलगा शुभम पाटील आणि सेतू सुविधा केंद्राच्या खासगी व्यक्ती समाधान पाटील यांना ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, २०१७-१८ ते २०२२-२३ या कालावधीत मेहू गावाचे सरपंच असलेल्या ४७ वर्षीय तक्रारदाराने गावातील व्यायामशाळेच्या बांधकामासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. २०२३ मध्ये जिजाबाई पाटील या सरपंचपदी निवडून आल्या. त्यानंतर तक्रारदाराने बांधकामासाठी मंजूर निधीच्या उर्वरित रकमेची मागणी केली.

सरपंच जिजाबाई पाटील यांनी चार लाख रुपयांचा धनादेश संबंधित ठेकेदाराला दिला, मात्र उर्वरित तीन लाख रुपये देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली. यासाठी तक्रारदाराला ३१ जानेवारी रोजी एक लाख रुपये आणि नंतर ७० हजार रुपये देण्यास सांगण्यात आले.

यानंतर, सरपंच पती गणेश पाटील यांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने हा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) कळवल्यानंतर विभागाने कारवाईची योजना आखली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मेहू गावात सापळा रचला. खासगी व्यक्ती समाधान पाटील याने ४० हजार रुपये स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर सरपंच जिजाबाई पाटील, पती गणेश पाटील आणि मुलगा शुभम पाटील यांनाही अटक करण्यात आली. यावेळी अंगझडतीत १० हजार १७० रुपये जप्त करण्यात आले.

या कारवाईसाठी पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नेत्रा जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने धडक कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here