जळगाव समाचार डेस्क | १२ फेब्रुवारी २०२५
उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात मेरापूर गावात कौटुंबिक वादातून नवरा-बायकोने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर त्यांची दोन लहान मुलं पोरकी झाली आहेत.
रामू वर्मा आणि त्याची पत्नी रूबी यांच्यात सातत्याने भांडणे होत असत. रामू रोजंदारीचे काम करत होता आणि दारू पिण्याची त्याला सवय होती. यावरून सोमवारी रात्री दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादातून संतप्त झालेल्या रूबीने गळफास घेऊन आयुष्य संपवले. पत्नीला मृत अवस्थेत पाहून रामू हादरला. त्याने दोन्ही मुलांना खोलीच्या बाहेर काढले आणि स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून, फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला आहे. आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
या घटनेनंतर मेरापूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या चार आणि तीन वर्षांच्या मुलांनी एकाच रात्री आई-वडिलांना गमावले. कुटुंबिय बाहेर गावी असल्याने घरात फक्त नवरा-बायको आणि मुलं होती. आई-वडिलांच्या निधनामुळे लहानग्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे.
रामूच्या दारूच्या सवयीमुळे त्याच्या पत्नीला वारंवार त्रास होत होता. याच गोष्टीवरून दोघांमध्ये भांडणे होत असत. शेवटी याच वादातून दोघांनीही टोकाचे पाऊल उचलले.