जळगाव समाचार | ७ फेब्रुवारी २०२५
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) तब्बल पाच वर्षांनंतर प्रथमच रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांचे हप्ते स्वस्त होण्याची शक्यता आहे.
RBI ने रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी केला असून तो आता 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवर आला आहे. फेब्रुवारी 2023 पासून रेपो दरात कोणताही बदल झाला नव्हता. आता तब्बल पाच वर्षांनी पहिल्यांदा हा दर कमी करण्यात आला आहे.
रेपो दर म्हणजे काय?
रेपो दर हा RBI कडून बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर असतो. जर RBI रेपो दर कमी करत असेल, तर बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जांचे व्याजदरही कमी होतात. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि अन्य कर्जदारांना याचा फायदा होतो.
रेपो दर कमी झाल्यामुळे बँका गृहकर्जावरील व्याजदर कमी करू शकतात. त्यामुळे ज्यांनी आधीच कर्ज घेतले आहे, त्यांचे मासिक हप्ते (EMI) कमी होऊ शकतात. तसेच, नवीन कर्ज घेणाऱ्यांनाही कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते.
या निर्णयामुळे गृहकर्ज आणि अन्य कर्जदारांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच, बाजारातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गासाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.
RBI च्या या निर्णयामुळे आर्थिक बाजारात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.