जळगाव समाचार डेस्क | ५ फेब्रुवारी २०२५
जळगाव शहरातील कासमवाडी जवळील रचना कॉलनीमध्ये वाढीव बांधकामावरून सुरू असलेल्या वादामुळे, महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान, शेख शादाब नावाच्या तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने, उपस्थित अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून अनर्थ टाळला. एमआयडीसी पोलिसांनी शेख शादाब यांना ताब्यात घेतले आहे.
शेख शादाब आणि त्यांचे शेजारी इम्रान अहमद यांच्यात वाढीव बांधकामावरून गेल्या वर्षभरापासून वाद सुरू होता. दोघांनीही महानगरपालिकेकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने प्रथम इम्रान अहमद यांचे वाढीव बांधकाम पाडले. यानंतर, शेख शादाब यांचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात होताच, त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला.
अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून शेख शादाब यांना रोखले आणि एमआयडीसी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी शेख शादाब यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेले आहे.