जळगाव जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; जिल्हा आरोग्य, सिंचन आणि हरित ऊर्जा क्षेत्रात मोठी भरारी घेणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव समाचार डेस्क | २६ जानेवारी २०२५

जळगाव जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पोलीस दलाने राष्ट्रीय सलामी दिली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी आपल्या संदेशात जिल्ह्याच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या योजना आणि उपक्रमांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, जळगाव जिल्हा लवकरच आरोग्य सेवांचे प्रमुख केंद्र बनेल. चिंचोली येथे 650 खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध होतील.

जिल्ह्यातील 8 सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जात असून, या प्रकल्पांमुळे 1 लाख 94 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होईल, असे पालकमंत्र्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात प्रधानमंत्री सौर ऊर्जा योजना व मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना अनुदानित सौर पंप उपलब्ध करून देत दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पात्रधारकांसाठी महाआवास अभियानांतर्गत दीड लाख घरे बांधली जाणार आहेत.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यात मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून 10 लाखांहून अधिक महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. याशिवाय, जळगाव शहरात महिलांसाठी ‘वन-स्टॉप सेंटर’ सुरू करण्यात आले असून मेहरूण येथे महिला व बालकल्याण भवन लवकरच पूर्ण होणार आहे.

जल जीवन मिशन आणि अमृत 2.0 योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गावांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी मिळेल.

जिल्ह्यातील 4.19 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे. तसेच, पीक विमा योजनेतून 3.87 लाख शेतकऱ्यांना 656 कोटी रुपयांचे सहाय्य मिळाले आहे. केळी उत्पादकांसाठी राष्ट्रीय फळबाग विकास कार्यक्रमांतर्गत 100 कोटी रुपयांची विशेष योजना अंमलात आणली जात आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 4,585 युवकांना रोजगार मिळाला आहे. जळगाव शहरात आधुनिक क्रीडा संकुल उभारले जात असून, यामध्ये विविध प्रशिक्षण सुविधा आणि मैदानांचा समावेश असेल. या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 607 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्याने निधी वितरणात राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून, आदिवासी उपयोजनाच्या निधी वितरणात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

पालकमंत्र्यांनी सांगितले की, “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या धोरणाच्या आधारावर जळगाव जिल्ह्याला आदर्श जिल्हा बनवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. भारतीय लोकशाहीच्या 75 वर्षांच्या यशस्वी वाटचालीत प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस दल, होमगार्ड, अग्निशमन दल, राष्ट्रीय सेवा योजना, गाईडचे विद्यार्थी यांचे पथ संचलन पोलीस बँडच्या धूनवर सादर झाले. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here