जळगाव समाचार डेस्क | २५ जानेवारी २०२५
तालुक्यातील नंदाणे येथील सरपंच रविंद्र निंबा पाटील आणि माजी सरपंच अतुल शिरसाठ यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. पेट्रोलपंप उभारणीसाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून, त्यातील 1 लाख रुपये घेताना ही कारवाई करण्यात आली.
नंदाणे गावातील गट क्रमांक 59/3 या जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोलपंप उभारणीसाठी परवानगी मिळवण्यासाठी तक्रारदाराने 1 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने ना हरकत प्रमाणपत्रासाठी ग्रामपंचायतीला सूचना पाठवली होती.
तक्रारदाराने ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकडे पत्र दिल्यानंतर त्यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन पाठपुरावा केला. मात्र, सरपंच रविंद्र पाटील यांनी स्वतःसाठी व ग्रामसेवकासाठी पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणी दरम्यान, सरपंच रविंद्र पाटील यांनी माजी सरपंच अतुल शिरसाठ यांच्या सहकार्याने तडजोडीनंतर अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. यादरम्यान एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून 1 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना सरपंच रविंद्र पाटील यांनी ती रक्कम माजी सरपंच अतुल शिरसाठ यांच्याकडे दिली. शिरसाठ यांनी ती रक्कम स्वतःच्या खिशात ठेवली. याच वेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून दोघांनाही रंगेहाथ पकडले.
सरपंच रविंद्र पाटील आणि माजी सरपंच अतुल शिरसाठ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले आहे.