भाडेवाढीने लालपरी खाणार भाव; रिक्षा-टॅक्सीचा प्रवासही महागला…

जळगाव समाचार डेस्क | २४ जानेवारी २०२५

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा झटका बसला आहे. महागाईच्या काळात ही दरवाढ सर्वसामान्यांसाठी मोठा झटका ठरली आहे. एसटी महामंडळाने तिकिट दरात तब्बल 14.97 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ आजपासून (24 जानेवारी) लागू होणार आहे.

याशिवाय, रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मंजुरी देण्यात आली आहे. या वाहनांच्या दरात 3 रुपयांची वाढ होणार असून, ही दरवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी महामंडळाला दररोज तीन कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे भाडेवाढीशिवाय अन्य पर्याय नसल्याचे सांगण्यात आले. डिझेल आणि सीएनजीचे दर वाढणे, मेंटनन्सचा वाढलेला खर्च यामुळे ही दरवाढ आवश्यक असल्याचे सरनाईक म्हणाले.

भाडेवाढीनंतरही काही प्रवाशांसाठी सवलती लागू राहतील. महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली असून, 75 वर्षांवरील वृद्धांसाठी शासनाने मदत करणे आवश्यक असल्याचेही मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले.

तिकिट दरवाढीमुळे प्रवाशांचे बजेट बिघडणार असले, तरी एसटी महामंडळाला तोट्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here