रेल्वे अपघातातील १२ मृतांची ओळख पटली, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात…

जळगाव समाचार डेस्क | २४ जानेवारी २०२५

पाचोरा तालुक्यातील परधाळे गावाजवळ झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातातील १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम पूर्ण केले आहे. या अपघातात ९ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. रात्री उशिरा सहा मृतदेहांचे शवविच्छेदन झाले, तर गुरुवारी दुपारी उर्वरित मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.

उत्तरप्रदेशातील लखनऊहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या एका बोगीला आग लागल्याची अफवा पसरली. यामुळे परधाळे गावाजवळ पुलावर गाडीचे चैन पुलिंग करण्यात आले. घाबरून प्रवासी रेल्वेगाडीतून खाली उतरले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडले, ज्यामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये लच्छीराम खन्नू पासी (४०, नेपाळ), कमला नवीन भंडारी (४२, नेपाळ, ह.मु. कुलाबा, मुंबई), बाबूखान मोहम्मद सफी खान (२७, उत्तरप्रदेश), हिकमत नंदराम विश्वकर्मा (१०, नेपाळ), इम्तियाज अली (३५, उत्तरप्रदेश), नसरुद्दीन बहुद्दीन सिद्दीकी (१९, उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी ओळख पटलेल्यांमध्ये नौकला मरुटे जयगडी (६०, नेपाळ, ह.मु. भिवंडी, ठाणे), शिवकुमार पृथ्वीराज चौहान (उत्तरप्रदेश), नंदराम विश्वकर्मा (नेपाळ), मैसरा नंदराम विश्वकर्मा (नेपाळ) आणि राधेश्याम अगनुराल (नेपाळ) यांची नावे समाविष्ट आहेत.

दुपारनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि ते आपल्या गावी नेण्यासाठी रवाना झाले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून अपघातग्रस्तांना पुढील मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.

यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी एम.एस. काझी, वरिष्ठ वाणिज्य मंडळ प्रबंधक अजय कुमार, स्टेशन प्रबंधक कौस्तुभ चौधरी यांसह अधिकाऱ्यांच्या पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालय गाठून कागदपत्रांची पडताळणी केली. मृतांच्या कुटुंबीयांना ५०,००० रुपयांची रोख मदत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here