जळगाव समाचार डेस्क | २१ जानेवारी २०२५
बीड येथील सरपंच देशमुख हत्याकांड आधीच गाजत आहे त्यात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एचआयव्हीच्या अफवेने एका कुटुंबाला समाजात वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कुटुंबाने सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला असून, या प्रकरणात पोलिस आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
पीडित कुटुंबाने सांगितले की, त्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या सासरच्या मंडळींनी पोलिस आणि डॉक्टरांना खोटी माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी गावात मुलीला एचआयव्ही असल्याची बातमी पसरवली. या अफवेने गावकऱ्यांनी कुटुंबाशी संपर्क तोडला, तसेच कोणालाही जवळ येऊ दिले नाही.
पीडित कुटुंबाने यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप सादर केली आहे. यात आष्टीतील बीट अमलदार काळे हे कुटुंबाला मुलीला एचआयव्ही असल्याचे सांगताना ऐकू येतात. त्यांनी मुलीच्या अंत्यविधीत सहभागी व्यक्तींच्या तपासणीची भीतीदेखील दाखवली होती.
या अफवेचा परिणाम इतका गंभीर झाला की, कुटुंबातील एका महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबाने सांगितले की, “गावकऱ्यांनी आम्हाला वाळीत टाकले आहे, आमच्यावर समाजात खोटे आरोप लावले जात आहेत. घरातील मुलंही जवळ येत नाहीत. फक्त अफवेने आमच्या जीवनावर परिणाम झाला आहे.”
या प्रकरणात पीडित कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आष्टी रुग्णालयातील डॉ. ढाकणे आणि बीट अमलदार काळे यांच्यावर खोट्या माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे.
या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.