जळगाव समाचार डेस्क | २० जानेवारी २०२५
जळगाव जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात एक खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे (वय ५५, रा. एरंडोल) यांना १ हजार रुपयांची लाच घेताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
पिंपळकोठा येथील प्राथमिक शाळेचे इन्स्पेक्शन सुरू असताना शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी. पाटील यांनी चांगला शेरा लिहिण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर आली. मुख्याध्यापक सोनवणे यांनी या रकमेसाठी शाळेतील प्रत्येक शिक्षकाकडून १-१ हजार रुपये गोळा करण्यास सुरुवात केली. यातील एका शिक्षकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तक्रारदाराकडून मुख्याध्यापक सोनवणे यांना १ हजार रुपये देताना रंगेहात पकडले. शिक्षण विस्तार अधिकारी पाटील यांची फोनद्वारे पडताळणी केली असता त्यांनी २ हजार रुपये घेतल्याबाबत विरोध केला नाही.
मुख्याध्यापक बळीराम सोनवणे आणि शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी. पाटील यांच्याविरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, आणि पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली.
या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रातील लाचखोरीचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यातील विश्वासाचे नाते अशा घटनांमुळे तडे जात असल्याचे दिसून येत आहे.