जळगाव समाचार डेस्क | २० जानेवारी २०२५
पाच वर्षांपूर्वी झालेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून सासरच्या लोकांनी जावयावर प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या केली. ही भयंकर घटना रविवारी (ता. 19) जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात घडली. या हल्ल्यात जावयाच्या कुटुंबातील सात सदस्यही गंभीर जखमी झाले आहेत.
मुकेश रमेश शिरसाट (रा. भीमनगर, पिंप्राळा हुडको) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पाच वर्षांपूर्वी मुकेशने पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. मात्र, या विवाहामुळे पूजाच्या कुटुंबीयांमध्ये राग होता. त्यांच्या कथित प्रतिष्ठेला तडा गेल्याच्या रागातून या घटनेचा उगम झाला.
रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्यावेळी पूजाचे काका सतीश केदार, भाऊ प्रकाश सोनवणे, व इतर नातेवाईकांनी त्याच्यावर कोयता, चॉपर व लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. हल्ल्यामुळे मुकेशच्या मानेवर गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
मुकेशला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ सोनू व इतर कुटुंबीय धावत आले. मात्र, हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली. या हल्ल्यात सोनूच्या हातावर व पाठीवर गंभीर जखमा झाल्या. त्याचप्रमाणे, मुकेशचे चुलते निळकंठ शिरसाट व त्यांच्या कुटुंबीयांवरही शस्त्राने हल्ला करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पूजाच्या कुटुंबीयांपैकी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सतीश केदार व इतर सहा जणांना अटक केली आहे.
मुकेशच्या चुलते निळकंठ शिरसाट यांनी सांगितले की, प्रेमविवाहानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मुलीचे कुटुंबीय सतत बदला घेण्याच्या तयारीत होते. रविवारी मुकेश एकटा असल्याची संधी साधून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
मुकेशचे भाऊ सोनू शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी मुकेशला धमकी दिली होती की, “तू पळून जाऊन लग्न केले; आता तुझ्या कुटुंबालाही संपवू.” या भांडणादरम्यान त्यांनी मुकेशवर जीवघेणा हल्ला केला.
कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली झालेल्या या क्रूर घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून आरोपींवर कठोर कारवाई होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.