जळगाव समाचार डेस्क | १८ जानेवारी २०२५
मुंबई: राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहेत. मात्र, यंदाच्या हॉल तिकिटांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला असून, त्यावर अनेक पालक, शिक्षक, व शिक्षण तज्ज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद कागदपत्रांशी जुळवून तपासण्यासाठी हॉल तिकिटांवर जातीचा उल्लेख केला असल्याचे सांगितले आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असमानतेची भावना निर्माण होऊ शकते, असे मत शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणाले, “विद्यार्थ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यासाठी बोर्ड अनेक प्रयत्न करतो, जसे की रोल नंबरवर स्टिकर लावणे. अशा स्थितीत हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करणे अनावश्यक आहे. निकालावर जात असते, त्यामुळे हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख का करावा, हा प्रश्न आहे.”
बारावीच्या हॉल तिकिटांचे वाटप सुरू झाले असून, दहावीचे हॉल तिकिट सोमवारी वितरित होणार आहे. कागदपत्रांवरील जात नोंदीत चूक असल्यास पालकांना शिक्षणाधिकारी उपसंचालक कार्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर करून बदल करण्याची सुविधा दिली आहे.
शिक्षणाचा उद्देश सामाजिक समता प्रस्थापित करणे आहे. मात्र, हॉल तिकिटांवरील जातीच्या उल्लेखामुळे हा उद्देश सफल होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये अवघ्या काही दिवसांचा अवधी असताना या वादामुळे पालक व विद्यार्थी चिंतेत आहेत. शिक्षण मंडळाने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.