जळगाव समाचार डेस्क | १७ जानेवारी २०२५
मुंबई: प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून संशयिताची चौकशी करण्यात येत आहे.
१५ जानेवारी रोजी पहाटे २.३० वाजता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात हा हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोर सैफच्या फ्लॅटमध्ये घुसला आणि मुलांच्या खोलीत ही घटना घडली. त्या वेळी खोलीत सैफच्या घरातील मोलकरीण अरियामा फिलिप उपस्थित होती. हल्लेखोराने मोलकरणीला चाकू दाखवून गप्प बसण्यास सांगितले. आवाज ऐकून सैफ खोलीत पोहोचला आणि त्याच्यावर हल्लेखोराने चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात सैफच्या मान, पाठ, हात, डोक्याला गंभीर दुखापत झाली. लीलावती रुग्णालयात सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टर नीरज उत्तमानी यांनी सांगितले की, सैफच्या पाठीच्या कण्यामध्ये चाकूचा एक तुकडा अडकला होता, तो यशस्वीरीत्या काढण्यात आला आहे.
घटनेच्या वेळी घरात सैफ, करीना आणि त्यांची मुले तैमूर आणि जेह यांच्यासह तीन महिला व तीन पुरुष नोकर होते. घरी चालक उपस्थित नसल्याने सैफला ऑटोमधून रुग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ संशयिताला ताब्यात घेण्यात आले. हल्लेखोराने मोलकरणीकडे एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे चौकशीत समोर आले आहे.
वांद्रे पोलिसांनी हल्ल्याचा तपास करण्यासाठी १० विशेष पथके तयार केली आहेत. याशिवाय गुन्हे शाखेची टीमही तपासासाठी कार्यरत आहे. विशेष तपास पथकात एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांचाही समावेश आहे.
करीनाची सोशल मीडिया पोस्ट
या घटनेनंतर रात्री करीना कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली, “आमच्यासाठी हा कठीण काळ आहे. आम्ही ही घटना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. माध्यमांना विनंती आहे की त्यांनी अटकळ आणि सततच्या कव्हरेजने आमच्या सुरक्षेला धोका निर्माण करू नये. कृपया आम्हाला आवश्यक ती स्पेस द्या.”
सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून हल्लेखोराने हल्ला का केला यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.