जळगावात भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…


जळगाव समाचार डेस्क | १६ जानेवारी २०२५

जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावर गुरुवारी (१६ जानेवारी) दुपारी सुमारे १ वाजता सिमेंटने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

विलास रामसिंग भिल (वय ४०, रा. ममुराबाद, ता. जि. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विलास भिल हा ऊसतोडणीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गुरुवारी तो दुचाकी (एमएच १० एआय ०३८१) ने जळगाव शहरातून ममुराबादकडे घरी जात असताना मितवा हॉटेलजवळ सिमेंटने भरलेल्या ट्रॅक्टरने (एमएच १९ पीआय ३३७५) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत विलास भिल यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी ट्रॅक्टरच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मृत विलास भिल यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here