जळगाव समाचार डेस्क | ७ जानेवारी २०२५
दिल्ली-एनसीआरसह बिहार, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील काही भागांमध्ये मंगळवारी सकाळी 6.35 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी होती.
या भूकंपाचा केंद्रबिंदू चीनच्या शिजांग भागातील जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होता. यामुळे नेपाळ, भूतान, सिक्कीम आणि उत्तराखंडसह ईशान्य भारतातही भूकंपाचा प्रभाव जाणवला.
भारत आणि शेजारी देशांतील स्थिती
सुदैवाने, भारतात भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. नेपाळ आणि चीनमध्येही अद्याप कोणतीही हानी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भूकंपानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भूकंपाचे धक्के जाणवताच अनेकांनी घराबाहेर पळ काढला. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तत्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि हवामान विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.