जळगाव समाचार डेस्क| ३ जानेवारी २०२५
जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने ‘खान्देश महोत्सव 2025’ चे आयोजन 3 ते 7 जानेवारी 2025 दरम्यान बॅरिस्टर निकम चौक, सागर पार्क येथे करण्यात आले आहे. खान्देशच्या स्थानिक कला, संस्कृती, परंपरा आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव भरवण्यात आला आहे.
महोत्सवाचे उद्घाटन 3 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी उपस्थित राहतील. प्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री ऋतुजा शिंदे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहेत.
या महोत्सवात महिला बचत गटांचे उत्पादने, फॅशन झोन, विंटर झोन, किड्स झोन, ‘माझी वसुंधरा’ विभाग, तसेच विविध खाद्य स्टॉल्स यांचा समावेश असेल. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत नागरिकांना विविध कार्यक्रम व प्रदर्शनांचा आनंद लुटता येईल.
महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबासोबत महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन केले आहे.