जळगाव समाचार डेस्क | १७ डिसेंबर २०२४
राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाल्यानंतर सोमवारी भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटातील काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचा स्फोट झाला. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, तानाजी सावंत यांच्यासह अन्य नेत्यांनी आपली नाराजी वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केली. काहींनी संताप व्यक्त करत खुलेआम टीका केली, तर काहींनी राजीनामा सादर केला.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन दीड तास चर्चा केली. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे गणेश नाईक यांच्यावर टोला लगावत, “ज्यांचा मुलगा आमच्या पक्षाविरुद्ध लढला, त्यांना मंत्रिपद मिळाले,” असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करत ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण केलेल्या कामाची आठवण करून दिली. “होय, मी नाराज आहे. मनोज जरांगे यांना अंगावर घेतले, ओबीसींचा लढा लढलो. त्याचे बक्षीस मिळाले,” अशी थेट प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांनी पुढे म्हटले, “जहॉं नही चैना, वहॉं नही रहना. मंत्रिपद आले किंवा गेले तरी भुजबळ संपणार नाही.” त्यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी आंदोलन केले.
शिंदेसेनेचे काही आमदारही मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत. भंडाऱ्याचे आमदार नरेश भोंडेकर यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा आणि विदर्भ समन्वयकपदाचा राजीनामा दिला. ते म्हणाले, “पक्षाने आदिवासी नेत्यांकडे दुर्लक्ष केले आहे.” पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनीही आदिवासींसाठी आवाज उठवत, “आदिवासी लोक फोन करून विचारत आहेत की पक्षाला आमची गरज आहे की नाही,” असे म्हटले.
शिंदेसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मौन स्वीकारले असून त्यांच्या कार्यालयातून एक निवेदन जारी करण्यात आले. “सावंत साहेब योग्यवेळी आपली भूमिका स्पष्ट करतील,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिंदेसेनेचे आणखी एक नेते विजय शिवतारे यांनी मंत्रिपद न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली. “पद मिळाले नाही याचे काही वाटत नाही, पण आमच्याशी साधी भेटही घेतली जात नाही, हे खटकते,” असे शिवतारे यांनी स्पष्ट केले.
बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनीही मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. ते अधिवेशनाला न जाता अमरावतीतच थांबले. “मी अधिवेशनात सहभागी होणार नाही,” असे त्यांनी ठामपणे जाहीर केले.
दरम्यान, शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी मात्र नाराजी फेटाळली. “मी नाराज नाही. सर्वांना विश्वासात घेऊन आणखी चांगले काम करून दाखवेन,” असे ते म्हणाले. काही ज्येष्ठ आमदारांनीही नाराजी व्यक्त करण्याचे टाळले.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेली नाराजी सरकारसाठी डोकेदुखी ठरली आहे. पक्षांतर्गत संघर्षामुळे नेतृत्वाला खुल्या टीका आणि आंदोलने सहन करावी लागत आहेत. या घडामोडी आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम करू शकतात.