जळगाव समाचार डेस्क | ९ डिसेंबर २०२४
जळगावकर नाट्यप्रेमींना उद्या, १० डिसेंबर रोजी फक्त १० रुपयांत ‘हमिदाबाईची कोठी’ या गाजलेल्या नाटकाचा आनंद लुटता येणार आहे. ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने हा प्रयोग छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता सादर होणार आहे.
कलरबोव फाउंडेशनचे सादरीकरण
जळगावमधील कलरबोव फाउंडेशनचे कलाकार ८० च्या दशकात गाजलेल्या या नाटकाचा प्रयोग सादर करणार आहेत. अनिल बर्वे लिखित या नाटकाने त्यावेळी रंगभूमीवर अधिराज्य गाजवले होते. अशोक सराफ, नाना पाटेकर, प्रदीप वेलणकर, भारती आचरेकर, नीना जोशी आणि विजया मेहता यांसारख्या नामवंत कलाकारांनी त्यावेळी या नाटकात काम केले होते.
प्रेक्षकांसाठी नाममात्र तिकीट दर
हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांना फक्त १० आणि १५ रुपयांत पाहता येणार आहे. जळगावच्या प्रेक्षकांनी या ऐतिहासिक नाटकाचा आनंद घ्यावा आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, जळगावच्या रंगभूमीवर इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे. नाट्यप्रेमींनी या प्रयोगाला नक्की हजेरी लावावी, असे आवाहन कलरबोव फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.