Sunday, December 22, 2024
Homeक्राईमलाच प्रकरणात एसीबीची मोठी कारवाई; एक लाचखोर पोलिसाला अटक, दुसरा फरार…

लाच प्रकरणात एसीबीची मोठी कारवाई; एक लाचखोर पोलिसाला अटक, दुसरा फरार…

 

जळगाव समाचार डेस्क | २८ नोव्हेंबर २०२४

दुचाकी अपघात प्रकरणात अटक न करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलिस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले असून, दुसरा आरोपी पसार झाला आहे.

पारोळा-धरणगाव रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संबंधित चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपी चालकाला अटक न करण्यासाठी पारोळा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हिरालाल देविदास पाटील आणि पोलीस शिपाई प्रवीण विश्वास पाटील यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर १५ हजार रुपयांवर व्यवहार ठरला.

तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) याबाबत तक्रार दाखल केली. त्या आधारे आज एसीबीच्या पथकाने कारवाई करत लाच स्वीकारताना हिरालाल पाटील याला रंगेहात अटक केली. मात्र, प्रवीण पाटील हा घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यातील दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

या कारवाईचे नेतृत्व धुळे लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी केले. त्यांच्यासह राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, रामदास बारेला, आणि प्रवीण पाटील या अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page