जळगाव समाचार डेस्क | २३ नोव्हेंबर २०२४
“गेल्या १० वर्षांत केलेल्या कामांची पावती म्हणून आज विजयाची हॅट्ट्रिक साधता आली. हा विजय फक्त जळगावकरांच्या आशीर्वादानेच शक्य झाला आहे. पुढील काळात प्रलंबित विकासकामे पूर्ण करून नवीन कामांना गती देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील,” असे प्रतिपादन आ. राजूमामा अर्थात सुरेश दामू भोळे यांनी विजयाच्या आनंदात व्यक्त केले.
जळगाव मतदारसंघात आ. राजूमामा भोळे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत इतिहास रचला. प्रांत व निवडणूक अधिकारी विनय गोसावी यांच्या हस्ते त्यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मतदार, कार्यकर्ते आणि महायुतीतील घटक पक्षांचे आभार मानले.
आ. भोळे यांनी विजयासाठी मेहनत घेणाऱ्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), लोकजनशक्ती पक्ष, पिरीप आणि महायुतीतील इतर घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
आ. भोळे यांनी मागील १० वर्षांत ५० टक्के विकासकामे पूर्ण केली असल्याचे सांगितले. उर्वरित २५ टक्के भूमिपूजन झालेली कामे लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रस्तावित २५ टक्के कामांना गती देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
“प्रलंबित कामांच्या पूर्ततेसह नवीन कामे हाती घेऊन मतदारसंघातील जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन,” असा निर्धार आ. भोळे यांनी व्यक्त केला.