नंदुरबार मध्ये भाजपला धक्का; माजी खासदार हीना गवितांचा पक्षाला रामराम…

 

जळगाव समाचार डेस्क | ५ नोव्हेंबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता आणि माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी पक्षाला रामराम करत अनपेक्षित निर्णय घेतला आहे. गावित यांनी पक्षाकडे राजीनामा पाठवला असून अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

अक्कलकुवा विधानसभेसाठी शिंदे गटाकडून विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर गावित यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपसोबत असलेल्या महायुतीत शिंदे गटाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत गावित यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.

हीना गावित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “शिंदे गटाचे नेते काँग्रेसचा प्रचार करत असल्याने महायुतीची निष्ठा फक्त आम्हीच पाळायची का? माझ्यामुळे पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचण होऊ नये म्हणून पक्षाचा आणि पदाचा राजीनामा दिला आहे. अक्कलकुवा मतदारसंघाला विकासाच्या बाबत नंबर वन करण्याचा माझा निर्धार आहे.”

गावित यांची अक्कलकुवा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू होती, परंतु अखेर ही जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्यात आली. त्यामुळे नाराज गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या मैदानात उतरायचा निर्णय घेतला आहे.

गावित यांच्या निर्णयामुळे अक्कलकुवा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. गावित घराण्याचा नंदुरबार मतदारसंघात पूर्वीपासून दबदबा असल्याने गावित यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे शिंदे गटाला फटका बसण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here