जळगाव समाचार डेस्क | ३ नोव्हेंबर २०२४
राज्याच्या ६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका तृतीयपंथी उमेदवाराने विधानसभा निवडणुकीत अधिकृत उमेदवार म्हणून उतरण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. रावेर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील यांनी ही परंपरा मोडून, केळी मजूर आणि आदिवासींसह अन्य वंचित घटकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
शमिभा पाटील यांचे मूळ नाव श्याम भानुदास पाटील असून त्या भुसावळच्या रहिवासी आहेत. त्यांनी फैजपूर येथून एम.ए. मराठीची पदवी घेतली असून सध्या कवी ग्रेस यांच्या साहित्यावर पीएच.डी. करीत आहेत. तृतीयपंथी असल्याचे त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी जाहीर केले आणि २०१४ मध्ये त्यांना अधिकृत नागरिकत्व मिळाले. यानंतर त्यांनी तृतीयपंथींच्या हक्कांसाठी मोठी न्यायालयीन लढाई लढली आहे, ज्यात पोलिस भरतीमध्ये तृतीयपंथींना आरक्षण मिळावे यासाठी न्यायालयीन संघर्षही सामील आहे.
रावेर मतदारसंघातील केळी मजुरांच्या समस्या, आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी, आणि बेरोजगारांच्या प्रश्नांवर न्याय मिळवून देण्यासाठी शमिभा पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्या केळी मजुरांच्या हक्कांसाठी ‘केळी मजूर विकास महामंडळ’ स्थापन करण्याचा मुद्दा उचलत आहेत. रावेर मतदारसंघात असलेल्या सुमारे पावणेदोन लाख असंघटित केळी मजुरांना माथाडी कामगाराचा दर्जा मिळावा, आदिवासींना संरक्षण मिळावे, आणि सातपुड्याच्या जैवविविधतेचे जतन व्हावे, अशी त्यांची मागणी आहे. त्याशिवाय केळीवरील प्रक्रिया उद्योगातून स्थानिकांना रोजगार निर्माण करण्याचा हेतू त्यांनी मांडला आहे.
शमिभा पाटील यांच्या या ऐतिहासिक निर्णयाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या उमेदवारीने राजकीय क्षेत्रात एक नवा अध्याय उघडला आहे, आणि तृतीयपंथी, आदिवासी, तसेच असंघटित कामगारांसाठी न्यायाच्या लढ्यात नवी आशा निर्माण झाली आहे.