जळगाव समाचार डेस्क | १ नोव्हेंबर २०२४
अमळनेर शहरात महायुतीतर्फे मंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल भाईंदास पाटील व खासदार स्मिता वाघ यांनी दिवाळी भेट पदयात्रा काढून व्यापारी बांधवांना शुभेच्छा दिल्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाच पावली देवी मंदिरातून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि माजी नगरसेवकांसह वाजत-गाजत या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.
या पदयात्रेत अनिल पाटील आणि स्मिता वाघ यांनी प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, तर व्यापारी बांधवांनी बाजारपेठेतील रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण, आणि गुंडगिरीवर नियंत्रण आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. “शहरात १०० टक्के गुंडगिरी थांबल्याने व्यापाऱ्यांना सुरक्षितता मिळाली आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्ही अनिल पाटील यांनाच आमदार म्हणून पाहू इच्छितो,” अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच, शहरातील नवीन २०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेने आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
पदयात्रेने व्यापारी क्षेत्रातील शिवाजी मार्केट, बाजारपेठ परिसर, भागवत रोड, मारवाडी गल्ली, स्टेशन रोड, सुभाष चौक, कुंटे रोड, दाणा बाजार, सराफ बाजार या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी महायुतीच्याच पाठीशी असल्याचे जाहीर केले, आणि काही व्यापार्यांनीही या पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
गुंडगिरीवर नियंत्रण आल्याचा व्यापाऱ्यांना दिलासा
शहरातील व्यापारी बांधवांना पूर्वी गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धमकावून खंडणी मागणे, उधारीचे माल घेणे आणि पैसे न देणे अशा समस्या भेडसावत होत्या. परंतु, अनिल पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या कारवाईमुळे गुंडगिरी थांबली असून व्यापारी निर्भयपणे व्यवसाय करत आहेत.
महायुतीचे फटाकेच दिवाळीत फोडणार – अनिल पाटील
“दिवाळीनिमित्त व्यापारी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी पदयात्रा काढली आहे. व्यापाऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद पाहता दिवाळीचे खरे फटाके महायुतीच उडवणार,” असे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
व्यापारी बांधव महायुतीच्याच पाठीशी – खासदार स्मिता वाघ
खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, “लोकसभा निवडणुकीत व्यापारी बांधव भाजप व महायुतीच्या बाजूने होते, तसेच याही निवडणुकीत व्यापारी बांधव महायुतीला पाठिंबा देत आहेत. विकासकामांमुळे अनिल पाटील यांना या निवडणुकीत जोरदार समर्थन मिळेल.”