जळगाव समाचार डेस्क | १ नोव्हेंबर २०२४
अमळनेर तालुक्यातील देवगाव-देवळी परिसरात भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा दुर्दैवी अपघात खडकी नाल्याजवळ घडला आहे. मृत व्यक्ती भानुदास पुंडलिक पाटील (वय ६४) असून ते चोपडा तालुक्यातील खाचणे गावचे रहिवासी होते. कामानिमित्त दुचाकीवरून अमळनेरकडे जात असताना ही घटना घडली.
देवगाव-देवळी फाट्याजवळून जात असताना, चोपड्याहून बदलापूरकडे जाणाऱ्या बसचालकाने भरधाव वेगाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत भानुदास पाटील रस्त्यावर दूरवर फेकले गेले, त्यांना डोक्याला, चेहऱ्याला व हाताला गंभीर दुखापती झाल्या. स्थानिकांनी तत्काळ त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दिवाळीसारख्या आनंदाच्या सणाच्या काळात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील करता व्यक्ती गमावल्यामुळे पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर कुटुंबीय व गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात भानुदास पाटील यांच्या चुलत भावाने दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक शेख मिनाजोद्दीन जहिरोद्दीन (रा. अडावद, ता. चोपडा) याच्याविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार सुनील पाटील करीत आहेत.