जळगावमध्ये गोळीबाराची घटनाः दोन तरुण जखमी, परिसरात तणावाचे वातावरण

 

जळगाव समाचार डेस्क | ३० ऑक्टोबर २०२४

शहरातील वाघ नगर स्टॉपजवळ मंगळवारी रात्री १० वाजता दुचाकीवरुन आलेल्या ६ ते ८ जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर गोळीबार करत हल्ला केला. या घटनेत अक्षय तायडे (वय २६, रा. समता नगर) आणि अक्षय लोखंडे (वय २१, रा. समता नगर) हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

घटनास्थळावर उपस्थित असलेल्या साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, टोळक्याने प्रथम तायडे आणि लोखंडे यांना मारहाण केली. त्यानंतर तायडेच्या मांडीला गोळी चाटून गेली, तर लोखंडेच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. या हल्ल्यामुळे दोघेही जखमी झाले आहेत. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्याजवळील दुचाकींची दगड टाकून तोडफोड केली. यात दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून पोलिसांची तत्काळ उपस्थिती न झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडूनही पोलिसांना त्याची माहिती मिळण्यास तासाभराचा विलंब झाला, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दुपारी एका उमेदवाराच्या उमेदवारी अर्जावरून झालेल्या शाब्दिक वादातून हा गोळीबार झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here