हे शक्तिप्रदर्शन नसून जनतेची साथ आहे – आ. राजू मामा भोळे

जळगाव समाचार डेस्क | २८ ऑक्टोबर २०२४

आमदार राजू मामा भोळे यांनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी आपले नामांकन दाखल केले असून जनतेच्या प्रचंड पाठिंब्याने संपूर्ण शहरात रॅलीने जल्लोष केला. हे शक्तिप्रदर्शन नसून जनतेची साथ आहे आणि याच पाठबळावर आम्ही जनतेची कामे करत आलो आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नामांकन रॅलीची सुरुवात जी. एम. फाउंडेशन येथील भाजपा कार्यालयातून करण्यात आली. रॅलीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार गिरीश महाजन आणि खासदार स्मिता वाघ यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. यावेळी महिलांनी आमदार भोळे यांचे औक्षण करून त्यांच्यावर प्रेम व्यक्त केले.

रॅलीत महिलांसह विविध वयोगटातील जनसमूहाने सहभागी होत परिसर दुमदुमून टाकला. शिवतीर्थ, नेहरू चौक, टॉवर चौक, प्रकाश मेडिकल चौक, बळीराम पेठ मार्गे वसंत स्मृती कार्यालयापर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे सभेमध्ये रूपांतर झाले, जिथे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यात माजी महापौर सिमा भोळे, माजी आमदार लता सोनवणे, जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, निलेश पाटील, अभिषेक पाटील आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले.

नामांकन दाखल केल्यानंतर राजू मामा भोळे म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत मी ५० टक्के कामे पूर्ण केली आहेत. उर्वरित २५ टक्के कामे मार्गी लागत असून, विजय झाल्यानंतर उरलेली कामे सुद्धा पूर्ण करतील.” जनतेच्या सेवेसाठी नेहमी २४ तास तयार असल्याने जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here