जळगाव समाचार डेस्क | २८ ऑक्टोबर २०२४
चोपडा शहरातील निर्मल डेअरी येथून घेतलेल्या दुधात प्लास्टिक सापडल्याचे कारण सांगून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत डेअरी मालकाला ७५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पिता-पुत्राविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ऋषी संजय पाटील (वय २७) व त्यांचे वडील उपशिक्षक संजय विक्रम पाटील (वय ५२, दोघे रा. बिडगाव ता. चोपडा, सध्या ह.मु. साने गुरुजी कॉलनी, चोपडा) अशी आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषी संजय पाटील यांनी दि. १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता निर्मल डेअरीमधून दूध घेतले होते. घरी जाऊन त्यांनी दूध तापवले असता त्यात प्लास्टिक सदृश्य साय आल्याचे दिसले. यावर ऋषी यांनी दूधाच्या त्या अवस्थेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. नंतर त्यांनी तो व्हिडिओ डेअरीचे संचालक प्रल्हाद बळीराम पाटील (वय ५५, रा. गणेश कॉलनी, चोपडा) यांना पाठवून “तुमची बदनामी टाळायची असेल तर एक लाख रुपये द्या, अन्यथा बदनामी करीन” अशी धमकी दिली.
त्यानंतर, ऋषी पाटील आणि त्यांचे वडील संजय पाटील हे दोघे प्रल्हाद पाटील यांना डेअरीवर भेटले आणि प्रकरण संपवण्याची मागणी केली. प्रल्हाद पाटील यांनी घाबरून ७५ हजार रुपये रोख रक्कम ऋषी पाटील यांना दिली. त्यानंतर ऋषी यांनी दूधामध्ये कोणतीही समस्या नसल्याचे सांगून प्रकरण मिटवले. या प्रकाराची माहिती प्रल्हाद पाटील यांनी चोपडा शहर पोलिसांना दिली. त्या आधारे ऋषी आणि संजय पाटील या पिता-पुत्राविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करीत आहेत.