वरणगाव येथीलआयुध निर्माणीमधून तयार होणाऱ्या गोळ्यांच्या (काडतूस) चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एके-४७ या पाच रायफलींची शस्त्रागारांचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला.
रायफल चोरीची ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. वरणगाव आयुध निर्माणीत देशाच्या लष्करासाठी एके ४७ रायफलच्या गोळ्या (काडतूस) तयार केल्या जातात. या गोळ्या तयार झाल्यानंतर सिमेवर पाठवण्याआधी त्यांची निर्माणी परिसरातच एके ४७ या रायफलद्वारे चाचणी घेतली जाते.
या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाच रायफलींची निर्माणीच्या शस्त्रागाराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना सोमवारी (दि.२१ ऑक्टोबर) समोर आली. यामुळे आयुध निर्माणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. पण, या गहाळ झालेल्या पाच रायफली कुठेही आढळल्या नाहीत. यामुळे अधिकाऱ्यांनी दोन दिवस गुप्तता पाळून बुधवारी (दि.२३) रात्री वरणगाव पोलिस ठाणे गाठले. तेथे कनिष्ठ कार्यप्रबंधक प्रदीपकुमार बाबूराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध आठ लाख रुपये किमतीच्या पाच रायफलींची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला.