जळगाव समाचार डेस्क | २४ ऑक्टोबर २०२४
आकाशवाणी चौकात दुचाकीस्वार महिलेकडे लायसन्स नसल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी फोटो काढत असताना, संबंधित महिला आणि तिच्या मुलाने महिला पोलिसासोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली. त्यानंतर महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले. या घटनेनंतर महिलेसह तिच्या पती आणि अल्पवयीन मुलाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी दुपारी, आकाशवाणी चौकात शहर वाहतूक शाखेतील महिला पोलिस कर्मचारी कर्तव्यावर हजर होत्या. त्यावेळी, एमएच १९ डीसी ९१६७ क्रमांकाच्या दुचाकीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आकाशवाणी चौकाकडे येणाऱ्या महिला सीना ध्रुव ठाकूर (रा. गणपती नगर) आणि तिच्या मुलाला पोलिसांनी थांबवून लायसन्सची विचारणा केली. लायसन्स नसल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी फोटो काढून चलन टाकण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेसह तिच्या मुलाने पोलिस कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला आणि शिवीगाळ केली.
वादात तीव्रता वाढल्याने महिलेने पोलिस कर्मचाऱ्याला फोटो काढण्याची परवानगी विचारून हुज्जत घातली. पोलिसांनी त्यांना वाहतूक पोलीस ठाण्यात येण्याचे आदेश दिले असता, महिलेने अश्लील शिवीगाळ करून महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले. यामध्ये महिला पोलिसाच्या खिशात हात घालून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यात आले.
या प्रकारानंतर महिला पोलिसाने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून महिला सीना ध्रुव ठाकूर, तिचा पती ध्रुव सेवाराम ठाकूर आणि त्यांच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब वाघ करीत आहेत.