जळगाव समाचार डेस्क | २३ ऑक्टोबर २०२४
लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्के बसत असताना जळगावमधील माजी खासदार उन्मेश पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंना साथ दिली होती. याचाच परिपाक म्हणून, आता चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासाठी उन्मेश पाटलांना शिवसेनेने एबी फॉर्म दिला आहे. या संदर्भात उन्मेश पाटलांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “ठाकरेंनी आमच्या कुटुंबाला एबी फॉर्म दिली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. एका डोळ्यात अश्रू, तर दुसऱ्या डोळ्यात आनंद आहे.”
उन्मेश पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट कापल्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी ठाकरेंना साथ देत भाजपविरोधात जोरदार लढत दिली. त्यांच्या या निष्ठेबद्दल, ठाकरेंनी त्यांना चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन त्यांच्या निष्ठेचा सन्मान केला आहे.
उन्मेश पाटलांच्या पत्नींच्या भावनांना वाट मोकळी
एबी फॉर्म मिळाल्यानंतर उन्मेश पाटलांच्या पत्नी संपदा पाटील भावनाविवश झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले. संपदा पाटील यांनी सांगितले की, “2014 मध्ये आम्ही भाजपसाठी काम केले होते, परंतु 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उन्मेश पाटलांसारख्या उच्चशिक्षित तरुणाला डावलले.” त्यामुळेच उन्मेश पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून आता विधानसभा निवडणुकीची जबाबदारी स्वीकारली आहे.
2019 च्या निवडणुकीतील लढतीचा संदर्भ
2019 च्या विधानसभा निवडणुकीत चाळीसगाव मतदारसंघातून भाजपचे मंगेश चव्हाण विजयी झाले होते. मात्र, उन्मेश पाटील यांनी 2014 मध्ये चाळीसगाव मतदारसंघात मोठे यश मिळवले होते, त्यामुळे त्यांचा या भागात चांगला प्रभाव आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची हीच लोकप्रियता आणि निष्ठा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी ताकद देणार असल्याचे मानले जात आहे.