जळगाव समाचार डेस्क | २२ ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पुणे जिल्ह्यातील भोरजवळ मोठ्या रकमेची रोकड जप्त करण्यात आली आहे. राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी दरम्यान एका गाडीत तब्बल ५ कोटी रुपयांची रोकड आढळून आली. काल (२१ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहा वाजता पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड-शिवापूर टोलनाक्यावर ही कारवाई केली. इन्कम टॅक्स विभाग व निवडणूक आयोगाला यासंदर्भात माहिती देण्यात आली असून अधिक चौकशी सुरू आहे.
सत्ताधारी नेत्याशी संबंधित कारमधून रोकड जप्त
ही इनोव्हा क्रिस्टा गाडी सांगोल्याची असून, ती नलवडे नावाच्या व्यक्तीची आहे. या गाडीतून रोकड सांगोल्याला नेण्यात येत होती. ही कार सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील काही तासांत या प्रकरणाचा मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांचे शहाजी पाटलांवर अप्रत्यक्ष आरोप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी या घटनेवर ट्विट करत अप्रत्यक्षपणे शहाजी पाटलांवर निशाणा साधला आहे. “मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोलनाक्यावर १५ कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर… मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले, १५ कोटींचा हा पहिला हप्ता!” असा सवाल राऊत यांनी केला आहे.
या घडामोडींमुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. रोकड नेमकी कोणासाठी होती, ती कोणाच्या आदेशानुसार नेली जात होती, याचा तपास सुरू आहे, आणि लवकरच यावर अधिकृत खुलासा होण्याची अपेक्षा आहे.