भुसावळ ;– विवाहित महिलेसह एका तरुणीसोबत आलेल्या बांभोरीच्या युवकाने भुसावळातील तापी पात्रात उडी घेतल्याची घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले ? याची अद्याप माहिती कळू शकली नाही. अविनाश राजू सोनवणे (24, बांभोरी) असे या युवकाचे नाव असून शुक्रवारी दिवसभर त्याचा नदीपात्रात शोध घेण्यात आला मात्र त्याचा तपास लागला नाही.
गुरुवारी अविनाश हा तरुण रावेर भागातून दुचाकी (एम.एच.19 बी.डी.3020) वरून एका विवाहित महिलेसह तरुणीसोबत तापी पुलावर आला व याचवेळी कुठल्यातरी वादातून तरुणाने तापी उडी घेतल्याची माहिती आहे. अविनाश हा झेरॉक्स दुकान चालवून उदरनिर्वाह करतो.तर त्याच्या परिवारात योगेश तसेच दोन विवाहित बहिणी असून अविनाश हा अविवाहित असल्याचे सांगण्यात आले.
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उध्दव डमाळे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र रात्रीच्या अंधारामुळे शुक्रवारी बोटीची मदत घेत तरुणाचा शोध घेण्यात आला मात्र तरुणाचा तपास लागला नाही. तरुणासोबत आलेली महिला जळगावची तर दुसरी मुक्ताईनगरची रहिवासी आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले .