जिल्ह्यात महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर…

 

जळगाव समाचार डेस्क | १९ ऑक्टोबर २०२४

जळगाव जिल्ह्यातील महामार्गांवर अपघातांच्या मालिकेत आणखी एका दुर्दैवी घटनेची भर पडली आहे. पारोळ्याहून धुळ्याकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारचा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विचखेडे गावाच्या अलीकडे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घडला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्विफ्ट कारमधील प्रवासी राहुल भाऊसाहेब अहिरे (वय २८) आणि नीलेश सुरेश पाटील (वय २३) हे तरवाडे, जिल्हा धुळे येथील रहिवासी होते. त्यांच्या सोबत गोविंद भास्कर राठोड (वय २४) रा. तरवाडे आणि महेश आत्माराम पाटील (वय २१) रा. मोंढाळे प्र. अ. ता. पारोळा हेही प्रवास करीत होते. स्विफ्ट कार भरधाव वेगाने धुळ्याकडे जात असताना विचखेडा गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला सुमारे पाचशे फूट फेकली गेली व चारवेळा उलटली.
या अपघातात राहुल अहिरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर नीलेश पाटील याला गंभीर अवस्थेत धुळे येथील रुग्णालयात नेले जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. महेश देवरे आणि गोविंदा वंजारी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिका, महामार्गाची १०३३ आणि नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिकेच्या सहाय्याने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गोविंद राठोड यांना पुढील उपचारांसाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघाताचा तपास सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here