जळगाव समाचार डेस्क | १७ ऑक्टोबर २०२४
आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात मतदारांशी संवाद साधण्यासाठी गाव भेट संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे ध्येय आणि विकास कामे मतदारांपर्यंत पोहोचवून त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याचा शुभारंभ शिरसाळा येथे श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिरात दर्शन घेऊन, जेष्ठ नेते रविंद्र पाटील आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.
यानंतर, रविंद्र पाटील, रोहिणी खडसे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शिरसाळा, चिंचखेडा सिम, कोल्हाडी, हिंगणे, आमदगाव, आणि बोदवड शहरातील विविध प्रभागात भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या समस्या ऐकल्या.
कार्यक्रमादरम्यान रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी मतदारांना संबोधित करताना सांगितले की, “हा मतदारसंघ नेहमीच शरद पवार यांच्या धर्मनिरपेक्ष आणि विकासाभिमुख विचारांच्या पाठिशी उभा राहिला आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असून, आता प्रलोभने दाखवून गद्दारीचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहावे.”
रोहिणी खडसे यांनीही यावेळी मतदारांना संबोधित करताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यांनी सांगितले की, “सत्ताधाऱ्यांनी महागाई कमी करण्याचे, शेतमालाला हमीभाव देण्याचे आणि युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर विविध योजना जाहीर करून प्रचंड महागाईमुळे दिलेली मदत काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघाचा विकास रखडला असून, त्याला चालना देण्यासाठी या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.”
या दौऱ्यात जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, बाजार समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, कैलास चौधरी, रामदास पाटील, अनिल पाटील, अनिल वराडे, विलास देवकर, सतिष पाटील, निलेश पाटील, किशोर गायकवाड, गणेश पाटील, मधुकर पाटील, डॉ. ए.एन. काजळे, भरत अप्पा पाटील, वामन ताठे, सुभाष पाटील, विनोद कोळी, शाम सोनवणे, विश्वनाथ पाटील, गोपाळ गंगतिरे, के.एस. इंगळे, प्रमोद शेळके, रामराव पाटील, शांताराम पाटील, हकीम बागवान, प्रविण पाटील, प्रमोद फरफट, निलेश पाटील, सचिन राजपुत, आनंदा पाटील, प्रफुल लढे, चंद्रकांत देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.