पुणे : राज्यातील कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचे पुनरागमन झाले आहे. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे वातावरण बदलले आहे. तसेच, कमाल तापमानातही घट झाली आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मेघगर्जनेसह जोरदार, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावर नैऋत्य भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्यकडे सरकले आहे. बुधवारी (दि.१६) रोजी ते चेन्नईच्या अग्नेय भागात असून, महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.