जळगाव समाचार डेस्क | १५ ऑक्टोबर २०२४
शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील बिजासनी मातेचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबाच्या दुचाकीला शुक्रवारी झालेल्या अपघातात जखमी झालेल्या नेहल मनोज शिंदे (वय २) आणि तिची आई हेमांगी मनोज शिंदे (वय २८, दोघी रा. चोपडा) यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. या घटनेमुळे चोपडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील मनोज शिंदे हे पत्नी हेमांगी आणि मुलगी नेहलसोबत एमएच १९ बीएम ५९९ क्रमांकाच्या दुचाकीने शुक्रवारी शिरपूर तालुक्यातील बिजासनी मातेच्या दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते दर्शन घेऊन चोपड्याकडे परतत असताना पळासनेर गावाजवळील रस्त्याच्या उतारावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात वाहनाची धडक एवढी जोरदार होती की, दोघी मायलेकींच्या पायावरून वाहन गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या मृत्युंजय देवदूत, लकी जाधव, विकास जगदेव, नीलेश दुबे यांच्यासह सांगवी पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी तत्काळ मदतकार्य करत, जखमींना महामार्ग रुग्णवाहिकेच्या साहाय्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखमांचे गांभीर्य लक्षात घेता उपचारादरम्यान रविवारी दोघींनीही प्राण सोडले.
या अपघाताने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.