जळगाव समाचार डेस्क | १५ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात आज संध्याकाळपर्यंत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर निवडणुकीच्या तारखांचीही घोषणा होणार आहे. निवडणुकीच्या तयारीला उभ्या महाराष्ट्राचे लक्ष महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागावाटपावर आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे जागावाटपाचे समीकरण समोर आले असून, काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याचे सूत्रांकडून समजते.
विश्वस्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक ११० जागांवर लढणार आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला ९० तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ८० जागांवर उमेदवार उतरवणार आहे. हे जागावाटप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपापसात चर्चा करून ठरवले आहे, अशी माहिती मिळत आहे.
राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे हे समीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. आघाडीच्या पक्षांनी एकत्रित येऊन भाजपसह महायुतीला टक्कर देण्याचे ठरवले आहे. आता निवडणुकीच्या रिंगणात या पक्षांचे सामंजस्य आणि युती कितपत यशस्वी ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आचारसंहितेची घोषणा होण्याआधीच महाविकास आघाडीचा हा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.