भुसावळ : दीपनगर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील नवीन ६६० मेगावॉट प्रकल्पातून खासगी रुग्णवाहिकेमधून साहित्य चोरी करून घेऊन जात असल्याचा संशयातून प्रकल्पातील एमएसएफच्या सुरक्षा रक्षकांनी चौकशीअंती रुग्णवाहिकेत प्रकल्पातील चोरीचे साहित्य आढळून आले. ही घटना १२ रोजी दुपारी साडेबारा वाजता उघडकिस आली.
चोरटयांना वाहनासह भुसावळ तालुका पोलिसांचा ताब्यात दिले आहे. दीपनगर औष्णीक प्रकल्पातील ६६० नविन मेगावॉट प्रकल्पातून १२ रोजी दुपारी गेटवर प्रकल्पातील सुरक्षा रक्ष वाहनांची चौकशी करत होते. या वेळी भेल कंपनीच्या मालकीचे साहित्य रुग्णवाहिका (एमएच १५, जीव्ही- ६७१६) या वाहनातून चालक व फुलगाव येथील शशिकांत भागवत चौधरी (वय ४९) हा चोरीचे साहित्य घेऊन जात होता.
दुपारी साडेबारा वाजता एमएसएफ सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रविण खैरे, रोहिदास महाजन, विनोद पवार, प्रविण पाटील या सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारावर त्याच्या रुग्णवाहिनीची चौकशी केली. त्या वेळी या रुग्णवाहिकेतून ५ हजारांच्या १० फायबर टाकी, १ हजार ८०० रुपयांचे नट-बोल्ट, ६४० रुपयाचे लहान नट-बोल्ट, ४ हजारांचे लोखंडी प्लेट,४०० रुपयांचा लोखंडी पाईप, १२० रुपयांचा लोखंडी पाईप, ४०० रुपयांचे सी चॅनल, ४८० रुपयांचे अॅगल, १२० रुपयाचे लहान अॅगल असा एकूण १२ हजार ९६० रुपयांचे साहित्य तसेच २० लाखाची रुग्णवाहिका असे एकूण २० लाख १२ हजार ९६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत प्रविण पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित शशिकांत चौधरी याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात या घटनेचा उपनिरीक्षक मंगेश दराडे तपास करत आहेत.