जळगाव भारत सरकारच्या पोस्ट ऑफिस विभागातर्फे फेब्रुवारी 2024 मध्ये आयोजित पत्रलेखन स्पर्धेत के.सी.ई.सोसायटी संचालित ओरिऑन इंग्लिश मिडिअम स्टेट बोर्ड स्कूल जळगाव या शाळेची इयत्ता 8 वी ची विद्यार्थिनी कु.सलोनी ज्ञानेश्वर घुगे हिने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
भारत सरकारच्या पोस्ट विभागातर्फे घेण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत राज्यभरातील इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. “अ लेटर टू फ्युचर जनरेशन: द वर्ल्ड आय होप यू इनहेरिट” या थीमवर असलेल्या सलोनीच्या उत्कृष्ट पत्राने न्यायाधीशांना प्रभावित केले आणि तिला सर्वोच्च स्थान मिळाले. तिच्या अतुलनीय कामगिरीबद्दल पुरस्कार स्वरुपात, सलोनीला प्रमाणपत्र ,स्मृतिचिन्ह आणि ₹25,000 चे रोख पारितोषिक मिळाले.
के.सी.ई. सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी संस्थेतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ₹ 5000/- रोख स्वरुपात देऊन सलोनीला तिच्या पालकांसह सन्मानीत केले. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार ज्ञानदेव टी. पाटील , सहसचिव ॲड प्रविणचंद्र जंगले आणि प्राचार्य डॉ.अशोक राणे आणि संस्थेचे प्रशासकीय शशिकांत वडोदकर तसेच शाळेचे प्राचार्य श्रीधर सुनकरी आणि उपप्राचार्या रजनी गोजोरेकर उपस्थित होते. पोस्ट विभागाने सलोनी, तिचे पालक आणि शाळेचे प्राचार्य व उप प्राचार्या यांचा त्यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाबद्दल सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे,शाळेचे प्राचार्य व उपप्राचार्य यांनी सलोनीच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन केले आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.