जळगाव शहरात विद्यालयाच्या परिसरात बनावट नोटांसह तरुण ताब्यात

जळगाव समाचार डेस्क | १० ऑक्टोबर २०२४

जळगाव जिल्ह्यात नकली नोटांचा सुळसुळाट होत असून, भुसावळसह इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील आर. आर. विद्यालयाच्या परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बुलेटवर आलेल्या एका तरुणाजवळ तब्बल ४८ हजार ५०० रुपये किमतीच्या पाचशेच्या ९७ नकली नोटा आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

आरोपी ताब्यात; गुन्हा दाखल

या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी संशयित आरोपी चेतन शांताराम सावकारे (वय २७, रा. पुण्यनगर, यावल) याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी, ९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता हा गुन्हा नोंदवण्यात आला.

बनावट नोटांची गोपनीय माहिती आणि कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास आर. आर. विद्यालयाच्या शेजारील गल्लीत संशयित चेतन सावकारे हा बुलेट क्रमांक एमएच सीएल २२२१ वर आलेला होता. त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करून चेतन सावकारेला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून एकूण ४८ हजार ५०० रुपये किमतीच्या पाचशेच्या ९७ नकली नोटा जप्त केल्या.
या प्रकरणी पोलीस अमलदार मिलिंद सोनवणे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार उल्हास चऱ्हाटे करीत आहेत. नकली नोटांचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जळगाव शहरात चिंता वाढली असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here