जळगाव समाचार डेस्क | ८ ऑक्टोबर २०२४
पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक गृप ग्रामपंचायतीचे दप्तर सरपंचाने बेकायदेशीरपणे स्वतःच्या घरी ठेवले असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, संबंधित सरपंचाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पाचोरा गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी सादर केले आहे.
मौजे लोहारी येथील नरेंद्र रामदास बडगुजर आणि इतर ग्रामस्थांनी गृप ग्रामपंचायतीच्या प्रोसेडींगच्या नकलांसाठी ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी दप्तर माझ्याकडे उपलब्ध नाही, ते सरपंच रंजना प्रविण पाटील आणि त्यांच्या पती प्रविण नामदेव पाटील यांच्या घरी आहे, अशी माहिती दिली. सरपंचांनी हे दप्तर ग्रामपंचायतीत जमा केले नसल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामात अडचणी येत आहेत.
सरपंचांनी ग्रामविकास अधिकारी यांच्या अनुपस्थितीत बेकायदेशीर ग्राम सभा आणि मासिक सभा घेतल्या असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच, त्यांनी बनावट ठराव आणि तक्रारी दाखल करून ग्रामविकास अधिकारी यांच्या बदलीसाठी प्रयत्न केले आहेत. या प्रकरणात संबंधित सरपंचांची चौकशी करून त्यांना अपात्र ठरविण्यात यावे आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या बदलीसाठी आवश्यक ती कारवाई होण्यापूर्वी चौकशी केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीची पूर्तता न झाल्यास ग्रामस्थांनी उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनावर नरेंद्र बडगुजर, अनंत बडगुजर, दीपक पाटील, संदीप पाटील, कडुबा बडगुजर, यशोदिप पाटील, हिरामण बडगुजर, रविंद्र बडगुजर, नाना पाटील, पितांबर बडगुजर, भास्कर बडगुजर यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत.