जळगाव समाचार डेस्क| ७ ऑक्टोबर २०२४
भारतीय वायूसेनेच्या 92 व्या वर्धापन दिनानिमित्ताने चेन्नईत आयोजित एअर शो दरम्यान डिहायड्रेशनमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 230 पेक्षा जास्त जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये पेरुंगलथूरचे 48 वर्षीय श्रीनिवास, तिरुवोट्टियूरचे 34 वर्षीय कार्तिकेयन, आणि कोरुकुपेटचे 56 वर्षीय जॉन यांचा समावेश आहे.
रविवारी (6 ऑक्टोबर) मरीना बीच येथे सकाळी 11 वाजता एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत चालला. कार्यक्रमासाठी सकाळी 8 वाजेपासूनच नागरिक मरीना बीचवर जमा होऊ लागले होते. मात्र, प्रचंड उष्णता आणि तडपतं ऊन यामुळे अनेक वयस्कर नागरीक कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच बेशुद्ध पडले. कार्यक्रम संपल्यानंतर, घरी परतताना लाखो नागरीक एकाच वेळी बाहेर पडल्याने वाहतूक कोंडी आणि गोंधळ निर्माण झाला.
पाणी विक्रेत्यांना हटवण्याचा निर्णय ठरला चूक
गर्दी नियमनासाठी, प्रशासनाने परिसरातील पाणी विक्रेत्यांना हटवलं, ज्यामुळे अनेक नागरीकांना पाण्याची टंचाई जाणवली. कार्यक्रम संपताच, मोठ्या प्रमाणात लोक बीचवरून बाहेर पडू लागले आणि रस्त्यावर प्रचंड गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. या परिस्थितीमुळे अनेक लोकांना तडपतं ऊन आणि पाणी अभावी त्रास झाला, आणि काहीजणांची प्रकृती खालावली.
समुद्रकिनारी स्थानिकांनी दाखवली मदत
घटनेच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या काही स्थानिकांनी पुढाकार घेत नागरिकांना पाणी पुरवलं आणि मदत केली. मेट्रो स्टेशनवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे नागरिकांना तातडीने घरी जाण्याची इच्छा होती, परंतु गर्दीमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.
अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या कमतरतेमुळे लाखो नागरीक फसले होते. अशा प्रकारच्या अपघातास प्रशासनाची तयारी अपुरी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.