जळगाव समाचार डेस्क | ६ ऑक्टोबर २०२४
“आजच्या आधुनिक युगातील स्त्रिया विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळत असताना, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. या विकृत मानसिकतेला ठेचण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत आणि स्वयंसिद्धा बनून दुर्गामातेचा अवतार धारण करावा,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी केले.
नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून संवेदना फाउंडेशन, मुक्ताईनगरतर्फे ‘नव दुर्गेची नऊ रूपे’ या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 900 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. देवीच्या विविध रूपांची प्रभावी चित्रे साकारत स्पर्धकांनी आपली कला सादर केली. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या, “नवरात्र उत्सव हा शक्तीचा उत्सव असून, देवीच्या विविध रूपांची उपासना केली जाते. दुर्गामातेने महिषासुराचा वध करून संकटांचा नाश केला. त्याचप्रमाणे आजच्या स्त्रीने संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज व्हावे. समाजातील अत्याचारांना तोंड देण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे अत्यावश्यक आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जे.ई. स्कूलचे मुख्याध्यापक नितीन भोंबे, कला शिक्षक सुरवाडे, व्ही.एम. चौधरी, व्ही.डी. पाटील, नितीन ठाकूर, भगवान कोल्हे आणि इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.