जळगाव समाचार डेस्क | २ ऑक्टोबर २०२४
खान्देशातील श्रद्धास्थान असलेल्या यावल तालुक्यातील शिरागड येथील सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात हजारो भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. तापी नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरात कोळन्हावी गावातून येणाऱ्या भाविकांना होडीने प्रवास करावा लागतो, कारण या भागात नदीवर अद्याप पूल नसल्यामुळे भक्तांची मोठी गैरसोय होते.
तापी आणि भोनक या दोन नद्यांना जोडणाऱ्या या परिसरात पूल नसल्यामुळे, कोळन्हावी गावाकडून मंदिरात येणाऱ्या भाविकांना होडीचाच आधार घ्यावा लागतो. पूर्वी या मार्गावर कच्चा रस्ता होता, पण तो पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. यामुळे वर्षभर मंदिरात येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
जय माता मित्र मंडळ, बेलखेडा (ता. बोदवड) येथील कार्यकर्त्यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शिरागड मंदिरातील अखंड ज्योत घेऊन घटस्थापना करण्यासाठी ८५ किलोमीटरचा पायी प्रवास सुरू केला आहे. या कार्यात योगेश गायकवाड, भूषण गायकवाड, करण गायकवाड, विलास गायकवाड, विकास माळी, मधुकर गायकवाड, किरण पाटील, आर्यन पाटील यांचा समावेश आहे.
ग्रामस्थांनी आणि भाविकांनी शिरागड आणि कोळन्हावी दरम्यान रस्ता आणि पथदिव्यांची मागणी अनेक वेळा शासनाकडे केली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनाही शिरागडच्या नवरात्रोत्सवाच्या दरम्यान निवेदन देण्यात आले होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत शिरागड ते कोळन्हावी नवीन रस्ता आणि पथदिवे बसवण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
शिरागड मंदिराला तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात तत्कालीन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना पत्र पाठवले होते, परंतु अद्याप त्या पत्राची दखल घेतली गेलेली नाही. भाविकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर पायाभूत सुविधा पुरवण्याची गरज असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.