जळगाव समाचार डेस्क | २८ सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील युवासेनेने विजय मिळवला आहे. युवासेनेने या निवडणुकीत दहाच्या दहा जागांवर बाजी मारत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (ABVP) धुव्वा उडवला आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही युवासेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
युवासेनेच्या उमेदवारांनी प्रत्येकी पाच हजारांपेक्षा अधिक मते मिळवली, तर ABVP च्या उमेदवारांना केवळ हजारांच्या आतच मतं मिळाली. या निकालामुळे ABVP ला मोठा धक्का बसला आहे.
विजयी उमेदवार
युवासेनेचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे आहेत:
– मयुर पांचाळ (ओबीसी प्रवर्ग)- 5350 मते
– शीतल देवरुखकर शेठ (SC प्रवर्ग)- 5498 मते
– डॉ. धनराज कोहचाडे (ST प्रवर्ग)- 5247 मते
– स्नेहा गवळी (महिला)- 5914 मते
– शशिकांत झोरे (NT प्रवर्ग)- 5170 मते
– प्रदीप सावंत (खुला प्रवर्ग)- 1114 मते
– मिलिंद साटम (खुला प्रवर्ग)- 1114 मते
– अल्पेश भोईर (खुला प्रवर्ग)- 1114 मते
– परमात्मा यादव (खुला प्रवर्ग)- 1114 मते
– किसन सावंत (खुला प्रवर्ग)- 1114 मते
आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
युवासेनेच्या दहाच्या दहा उमेदवारांचा विजय स्पष्ट झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “मतदार राजाने आमच्यावर जो विश्वास ठेवला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. निवडणुकीत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न झाले होते, परंतु न्यायालयाने योग्य निर्णय घेतला आणि आम्हाला विजय मिळवला. हा विजय फक्त सुरुवात आहे, पुढील निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी असाच विजय मिळवेल.”
ABVP च्या तक्रारी आणि हायकोर्टाचा निर्णय
नवी मुंबईत सिनेट निवडणुकीदरम्यान बोगस पोलिंग एजंट प्रकरणात ABVP ने हायकोर्टात धाव घेतली होती. त्यांनी युवासेनेचे उमेदवार अल्पेश भोईर याला अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. तथापि, हायकोर्टाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला असून, संपूर्ण प्रक्रियेला दोषी ठरवता येणार नाही, असे स्पष्ट केले.
अखेर, युवासेनेच्या उमेदवारांनी बाजी मारल्याने त्यांचा विजय राज्यातील आगामी राजकीय चित्रात महत्त्वाचा मानला जात आहे.