जळगाव समाचार डेस्क | २६ सप्टेंबर २०२४
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे एका महिलेला चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीला तातडीने अटक केली असून, भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेचे नाव सोनाली महेंद्र कोळी (रा. साकेगाव, ता. भुसावळ) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली महेंद्र कोळी यांचे सागर रमेश कोळी (वय २८) या तरुणासोबत काही कारणावरून भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून सागर कोळीने चाकूने पाठीवर व पोटावर वार करून सोनाली कोळी यांचा खून केला. भांडण सोडवण्यासाठी विनोद सुभाष कुंभार (वय २८) पुढे आला असता, त्याच्यावरही हल्ला करत सागर कोळीने त्याला “आमच्या मधात येऊ नकोस, नाहीतर तुला ठार मारीन” असा इशारा दिला.
पोलिसांची तातडीची कारवाई:
घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून तो भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आला. संशयित आरोपी सागर रमेश कोळी याच्यावर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला गुरुवारी, २६ सप्टेंबर रोजी पहाटे अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव करत आहेत.