जळगाव समाचार डेस्क | २५ सप्टेंबर २०२४
मुक्ताईनगर येथील पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी (बीडीओ) आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे वैतागलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मंगळवारी (ता. २४) थेट पंचायत समितीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. गटविकास अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय किंवा जिल्हा परिषदेत पाठवल्याशिवाय हे कुलूप उघडले जाणार नाही, असे स्पष्ट संकेत खडसे यांनी दिले आहेत.
गटविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा उघडकीस
मुक्ताईनगर पंचायत समितीमध्ये घरकुल आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीत अनेक नागरिकांच्या तक्रारी आणि कामांमधील अपारदर्शकता उघड झाली. संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) मुख्य अधिकारी लोखंडे यांनी यावेळी खडसे यांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र खडसे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या.
कामे प्रलंबित, नागरिकांचा संताप
ग्रामपंचायतीकडून आलेले ठराव मंजूर न करता इतर व्यक्तींचे ठराव मंजूर होणे, पैशांची मागणी करून कामे करणे आणि सहा-सात महिन्यांपासून प्रलंबित असलेली कामे यांमुळे नागरिकांनी बीडीओंविरोधात तक्रारी केल्या होत्या. रक्षा खडसे यांनी या सर्व प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली असून, बीडीओ निशा जाधव यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
बीडीओ रुग्णालयात दाखल
या संपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बीडीओ निशा जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या मुक्ताईनगर येथील रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली.