जळगाव समाचार डेस्क | २५ सप्टेंबर २०२४
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील निवृत्त परिचारिका स्नेहलता चुंबळे यांचा मृतदेह शोधण्यासाठी सुरू असलेल्या तपासात तापी नदीत पाच बेपत्ता मृतदेह सापडले आहेत. या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचे मृतदेह आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यापैकी एका मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी स्नेहलता चुंबळे यांच्या कुटुंबीयांचे डीएनए नमुने घेऊन ते मॅच करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, चुंबळे यांचा मृतदेह असल्याची शक्यता कमी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चुंबळे प्रकरण : तपास अद्याप सुरूच
मूळ जळगावातील रहिवासी असलेल्या स्नेहलता चुंबळे या जिल्हा परिषदेच्या कर्मचारी होत्या. त्या नाशिक येथे स्थायिक झाल्या होत्या. २० ऑगस्ट रोजी जळगावात आयोजित ग. स. सोसायटीच्या वार्षिक सभेसाठी आल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. या प्रकरणाचा तपास करताना त्यांची हत्या झाल्याचे समोर आले. जिल्हा परिषदेतील कर्मचारी जिजाबराव पाटील आणि विजय निकम यांनी ३० लाखांच्या आर्थिक कारणावरून चुंबळे यांची गळा आवळून हत्या केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्यांनी मृतदेह तापी नदीत फेकला असल्याचे कबूल केले.
पोलिसांचे प्रयत्न सुरू
तापी नदीत सापडलेल्या मृतदेहांपैकी एका मृतदेहाचे डीएनए नमुने घेऊन त्यांची जुळवणी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. मात्र, अद्याप स्नेहलता चुंबळे यांच्या मृतदेहाचा शोध लागलेला नाही.